मुख्यमंत्री फडणवीस भडकले; दावोस गुंतवणूक मोहिमेला बदनाम करण्यासाठी पेड टूलकिटचा आरोप

Foto
नागपूर : महाराष्ट्र सरकारचा दावोस दौरा आणि त्यातून मिळणाऱ्या गुंतवणूक संधी राज्याच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा देणाऱ्या ठरणार असल्याचा विश्‍वासही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
जागतिक आर्थिक मंचाच्या (वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम) दावोस परिषदेत महाराष्ट्र सरकारने उभारलेल्या गुंतवणूक मोहिमेची विश्‍वासार्हता डागाळण्यासाठी सोशल मीडियावर पेड टूलकिटद्वारे खोटी माहिती पसरवली जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी गुरुवारी केला. राज्य सरकारला मिळालेल्या प्रचंड परकीय गुंतवणुकीच्या करारांमुळे राजकीय विरोधक अस्वस्थ झाले असून त्यातूनच हा अपप्रचार सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दावोस येथून दूरदृश्‍य प्रणाली द्वारे पत्रकार परिषदेत बोलताना फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र सरकार जागतिक कंपन्यांशी करणार असलेल्या सामंजस्य करारांवर संशय निर्माण करण्यासाठी एकसारखी छायाचित्रे व मजकूर विविध समाज माध्यमांवर पद्धतशीरपणे पसरवले जात आहेत. खोटी कथा तयार करण्यासाठी अनेकांनी पेड टूलकिट तयार केले आहे. काही ठरावीक व्यक्तींकडून सातत्याने तेच छायाचित्र आणि मजकूर वापरून चुकीचा प्रचार केला जात आहे, असा आरोप त्यांनी केला.

महाराष्ट्राने मोठ्या प्रमाणावर परकीय थेट गुंतवणूक आकर्षित केल्याचे काहींना सहन होत नसल्यामुळे हा विरोध होत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. महाराष्ट्राच्या यशाची काही लोकांना पचनशक्ती नाही. हे सगळं कोण करतंय, हे मला माहीत आहे. मात्र आमच्या कामातूनच आम्ही त्यांचा पर्दाफाश केला आहे. अशा लोकांना उत्तर देण्याची आम्हाला गरज वाटत नाही, असेही ते म्हणाले. मात्र त्यांनी कोणत्याही व्यक्तीचे किंवा राजकीय पक्षाचे नाव घेण्याचे टाळले.

दावोस परिषदेत यापूर्वी जाहीर झालेल्या काही गुंतवणूक करारांचे प्रत्यक्षात रूपांतर झाले नसल्याचा मुद्दा उपस्थित केला जात असल्याबाबत विचारले असता, फडणवीस यांनी ती तुलना फेटाळून लावली. त्यांनी मागील वर्षांतील आकडेवारीशी सध्याच्या गुंतवणूक प्रस्तावांची तुलना करत स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली.

2020-21 च्या काळात 79 हजार ते 80 हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार होत होते. आज आम्ही 30 लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीचे करार करत आहोत, असे त्यांनी सांगितले. या यशामुळे काहींमध्ये मत्सराची भावना निर्माण होणे स्वाभाविक असल्याचे नमूद करत, अशा मानसिकतेच्या लोकांकडे दुर्लक्ष करणेच योग्य आहे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.